
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात नसल्याने तेथे किरकोळ बाजारात साखरेच्या किंमती उच्च पातळीवर पोचल्या आहेत. घरगुती ग्राहकांची गरज पुरविण्यासाठी सरकार साखरेचा औद्योगिक वापर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोना संकटामुळे आयातीला उशिर होत असल्याने साखरेची टंचाई निर्माण होत आहे. या परिस्थितीमुळे तेथील सरकारला ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
इंडोनेशियात साखरेची चणचण भासत असल्याने भारताला या देशात साखर निर्यात करण्याची मोठी संधी आली असल्याचे मत साखर उद्योगातील सुत्रांचे आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक बंदरावर निर्यातीसाठीच्या हालचाली वाढल्या असून मजूर, व जहाजे उपलब्ध होतील तशी साखर बाहेर पाठविण्यासाठी तयारी सुरु आहे. इंडोनेशिया हा भारताचा प्रमुख आयातदार देश आहे. दरवर्षी हा देश थायलंडकडून मोठ्या प्रमाणात साखर आयात करतो. यंदा थायलंडमध्येही साखर उत्पादन घटले आहे.
इंडोनेशियाला वार्षिक ४५ लाख टन साखरेची गरज लागते. गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात सर्वच वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठी बंधने आली आहेत. यात साखरेचाही समावेश आहे. गेल्या जुलै महिन्यात भारतातून साखर आयात करण्यासाठी इंडोनेशियाने आपल्या आयात मापदंडात बदल केला होता. आयात कर १५ टक्याहून ५ टक्यावर आणला होता. या शिवाय ६०० ते १००० इकुम्सा दर्जाची कच्ची साखर खरेदी करण्यासही संमती दाखविली होती.
साखर संघाचे प्रयत्न
राष्ट्रीय साखर महासंघानेही याबाबत सकारात्मक प्रयत्न केले होते. केंद्राने गेल्या सहा महिन्यात निर्यातीला प्रोत्साहन देताना अनुदानाशिवाय कोटे वाढवून देण्याचेही प्रयत्न सुरु केले. याला अनेक कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी निर्यातीच्या करारातही वाढ झाली. परतू मार्चच्या मध्यानंतर मात्र सगळेच घोडे अडले. करार झालेली साखर बंदरात पडून राहिली. यामुळे साखरेची गरज असतानाही संबधित देशांना साखर पोचणे अडचणीचे झाले. त्याचे तात्कालीक परिणाम इंडोनेशिया सारख्या देशावर होत आहेत.
इंडोनेशियाकडून जादा साखर खरेदीची शक्यता
सध्या साखरेच्या या प्रश्नावर तेथील राष्ट्रपतीसह अन्य मंत्र्यानाही गांभिर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. भारतात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कमी उत्पादित झाली असली तरी शिल्लक साखर जादा प्रमाणात असल्याने याचा फायदा साखर कारखाने घेवू शकतात असे साखर उद्योगातील सुत्रांनी सांगितले. इंडोनेशियाला कोणत्याही परिस्थितीत तेथील गरज भागविण्यासाठी साखरेची आवश्यकता असल्याने किंमती नियंत्रीत ठेवण्याकरिता हा देश आपल्या नेहमीच्या गरजेपेक्षा अधिक साखर खरेदी करु शकतो, अशी शक्यता साखर उद्यागोतून व्यक्त करण्यात येत आहे.