support@dailyagronews.com      +91-8484924178

अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसा

अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसा
By: Agro11 Posted On: January 07, 2018 View: 377

अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसा

इस्राईलमधील पशुपालनाची त्रिसूत्री म्हणजे गाईंचा शरीरताण कमी करणे, आराम वाढविणे, शरीरक्रिया सुलभ करणे होय. संतुलित आहार, वेळेवर उपचार, गोठ्यात मुक्तपणे फिरण्याची मुभा, स्वच्छता ठेवल्याने येथील इस्राईल होल्स्टिन फ्रिजीयन गाईंचे आरोग्य आणि दुग्धोत्पादन चांगले आहे.

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित इस्राईल अभ्यास दौऱ्यात आम्हाला आधुनिक दुग्ध व्यवसाय जवळून पाहता आला. आम्ही तेल अवीव शहराजवळील होफ-हा-शेरोन येथील आधुनिक गोठ्याला भेट दिली. या ठिकाणी इस्राईल होल्स्टिन फ्रिजीयन गायींबद्दल सांगताना मुख्य व्यवस्थापक रोनेन फिगेनबम म्हणाले की, इस्राईलमधील स्थानिक गायींची दूध देण्याची अानुवांशिक क्षमता कमी होती. दुसऱ्या देशातून गाई आणून संगोपन करायचे झाले असते तर इस्राईलमधील उष्ण हवामान या गाईंना मनावणारे नव्हते. त्यामुळे आमच्या पशुवैद्यकांनी स्थानिक इस्राईली गायींचा डच वळूंबरोबर बऱ्याच पिढ्या संकर करून चांगली अानुवांशिकता असलेली, जास्त दूध देणारी आणि उष्ण हवामान सहन करू शकणारी इस्राईल होल्स्टिन फ्रिजीयन गाईची जात विकसित केली. या संशोधानामुळे इस्राईलमध्ये जिथे साठच्या दशकात एका गाईचे प्रति वेतास सरासरी दूध उत्पादन ३,५०० लिटर इतके होते ते वाढून १२,००० लिटरपर्यंत पोचले.

यांत्रिकीकरणावर भर
इस्राईलमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने बऱ्याच अंशी गोठ्यांचे यांत्रिकीकरण झाले आहे. इलेक्ट्रॉनिक मिल्क मीटरमुळे गाईंच्या दुधाची मोजणी, हाताळणी यांत्रिक पद्धतीने होते. पिडोमिटरमुळे गायींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो. गायींना आजार होण्याआधीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. संगणक प्रणालीमुळे गायींचा आहार, प्रजननक्षमता, अानुवंशिकता, खाद्यव्यवस्थापन, लसीकरण आणि वासरांच्या संगोपनातील बारीक घटकांची नोंद ठेवली जाते. वर्षभराच्या नोंदीचा तक्ता संगणकावर उपलब्ध असतो. त्यामुळे प्रत्येक गाईचे आरोग्य आणि दूध उत्पादकतेचे विश्लेषण केले जाते. संपूर्ण माहितीच्या एकत्रीकरणामुळे गायींच्या दूध उत्पादनाच्या संभाव्य बाबी सहज लक्षात येतात. प्रत्येक गाईची नोंद व्यक्तिगत पातळीवर ठेवल्याने दूध वाढ किंवा घटण्याची कारणे लगेच लक्षात येतात. गोठ्यावर बसविलेल्या सोलर पॅनल पासून वीजनिर्मिती केली जाते. ही वीज तेथील वीजवितरण कंपनीला विकली जाते. गाईच्या शेणमुत्रावर योग्य प्रक्रिया केल्यामुळे मिथेन वायूची पातळी कमी राखण्यास मदत झाली आहे.

असे आहे गोठ्याचे व्यवस्थापन
केवळ १७ जण पाहतात ११५० गाईंचे व्यवस्थापन.

लहान वासरे, भाकड गाई, दुधाळ गाई, पहिलारू गाई, व्यायलेल्या गाई अणि गाभण गाईंसाठी स्वतंत्र विभाग. 

शेडची दिशा उत्तर दक्षिण. गॅल्व्हनाइज पाइपने शेडची उभारणी. उंची २५ ते ३० फूट असल्यामुळे शेडमध्ये खेळती हवा. 

मुक्त संचार गोठ्याच्या दोन्ही बाजूंना गाईंची समसमान संख्या. मुक्त संचार गोठ्यास चहुबाजूंनी लोखंडी तारेचे कुंपण.

गोठ्याच्या छतावरील सोलर पॅनलमधून वीजनिर्मिती. गोठ्यात थंडपणा राखण्यासाठी दर २० फुटांवर पंखे. गाईंना थंड ठेवण्यासाठी फॅागर्सद्वारे पाण्याचे तुषार गाईच्या अंगावर सोडण्यात येतात.

दोन्ही गोठ्यांच्या मध्यभागी चारा देण्यासाठी तीस फुटांचा गाळा. या ठिकाणी एका ट्रॅालीमधून पशुखाद्य मिश्रण सर्व गाईंना योग्य प्रमाणात दिले जाते. 

प्रत्येक गाईच्या पायाला सेन्सर टॅग. प्रत्येक गाईस उभे राहण्यासाठी ३ चौ.मी.एवढे क्षेत्रफळ.

गोठ्यात गाई उभी राहण्याची जागा, खाद्य पुरवण्याच्या जागेचा भाग सिमेंट काँक्रीटचा किंवा फरशीचा. गोठ्यातील जमिनीवरील दगड, फरशी, सिमेंट, कोबा इत्यादी प्रकार गाईंचा शरीरताण वाढवितात आणि दूध कमी होते. त्यामुळे गाईंना फिरण्यासाठी आणि आराम करण्याची जागा मातीने भुसभुशीत ठेवलेली असते. 

चारा खाल्ल्यानंतर गाई बराच वेळ मुक्त संचार गोठ्यात आरामशीरपणे रवंथ करतात. मोकळ्या जागेत गाईंना पुरेसा दैनंदिन व्यायाम मिळाल्याने शरीरताण आपोआप कमी होतो. गोठ्यातील थंडाव्यामुळे गायींच्या दूध देण्याच्या क्षमतेत अनुकूल वाढ.

गोठ्यात शेण, मुत्राचे एकत्रित संकलन. पाईपद्वारे एका मोठ्या टाकीत वाहून नेले जाते. तेथे प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाते. यामुळे गोठ्यात कुठेही माशा, घाणेरडा वास किंवा अस्वच्छता दिसत नाही.

गाईंचे कृत्रिम रेतन. पशुवैद्यकीय अधिकारी आणि सरकारी संस्थेमार्फत गाईंची वेळोवेळी आरोग्य तपासणी.

मिल्किंग पार्लरची सोय 
गायींची धार मिल्किंग यंत्राद्वारे काढली जाते. यामध्ये फ्लोमीटर जोडला असल्याने सडातून दूध येण्याचे प्रमाण, सडातून किती वेळात दूध येते, कासदाह रोगाचे निदान अगोदर करता येते. 

गाईंना धार काढण्यासाठी पार्लरमध्ये आणायच्या आधी त्यांच्या अंगावर ३० सेकंद थंड पाण्याचा फवारा अणि पुढे ३० सेकंद पंखे चालू करून वारा सोडला जातो. यामुळे गाईंवर येणारा तापमानाचा ताण कमी होतो. दूध उत्पादन क्षमता वाढते. 

एकावेळी ३२ गाईंची धार काढली जाते. तासाला सरासरी २७० गायींची धार काढली जाते. एका दिवसात तीन वेळा गायींची धार काढली जाते. 

यंत्राद्वारे काढलेले दूध पाइपने गोळा करून ४४,००० लिटर क्षमतेच्या टँकमध्ये गोळा केले जाते. तेथे ४८ तासांपर्यंत साठवून ठेवले जाते. हे शीतकरण केलेले दूध हे प्रक्रिया करणाऱ्या कंपनीकडे पाठवले जाते. 

संतुलित खाद्य पुरवठा 
हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने गाईंना गव्हाच्या काडापासून तयार केलेला मूरघास बारीक करून मिक्स्ड राशनच्या स्वरूपात दिला जाताे.

मिक्स्ड राशनमध्ये मुरघास ३० ते ३५ टक्के, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सूर्यफूल पेंड, भरडलेला मका इत्यादी असे एकूण अकरा खाद्य घटक ६५ टक्के.

टोटल मिक्स्ड राशन देण्याच्या यंत्रामध्ये फीडट्रोल संगणक प्रणालीचा वापर. मूरघास आणि त्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या अकरा खाद्य मिश्रणांचे प्रमाण संगणकीय प्रणालीनुसार टीएमआर वॅगनमध्ये भरून व्यवस्थित मिसळले जाते. त्यानंतर गाईंना खाद्य मिश्रणाचा पुरवठा. 

लहान वासरांना दुधापासून तोडल्यानंतर मिल्क रिप्लेसरच्या स्वरूपात कृत्रिम दूध दिले जाते. 

भाकड गाईंचे योग्य पद्धतीने पालनपोषण.

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral