support@dailyagronews.com      +91-8484924178

वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावर

वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावर
By: Agro_money Posted On: May 29, 2020 View: 132

वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावर

जळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील वस्त्रोद्योग आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याच वेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे तब्बल १० टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाल्याने जगात भारतीय कापूस सर्वात स्वस्त म्हणजेच ३२ हजार ५०० ते ३४ हजार रुपये प्रतिखंडी (३५६ किलो रुईची एक खंडी) या दरापर्यंत आहे. यामुळे चीनसह बांग्लादेश, व्हिएतनाममधून भारतीय कापसाला मागणी सुरू झाली आहे. या महिन्यात बांगलादेशात सर्वाधिक दोन लाख, चीन व व्हिएतनाममध्ये प्रत्येकी एक लाख कापूस गाठींची निर्यात झाली

लॉकडाउनमुळे जगातील वस्त्रोद्योगाला फटका बसला. वस्त्रोद्योगात आघाडीवर असलेल्या चीनसह भारत, बांगलादेश, व्हिएतनाम, पाकिस्तानमधील सूतगिरण्या, कापड मिल्स हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. देशात कोलकता, अजमेर, दिल्ली, वरंगल, रांची, लुधियाना या भागातील वस्त्रोद्योग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परिणामी देशांतर्गत मिल्समध्ये सुताची उचल सुरू झाली आहे. ही उचल कमी असली तरी ती परिस्थिती अनुकूल झाली तर मागणी पुढे वाढू शकते. देशांतर्गत वस्त्रोद्योगाला किमान २९० लाख गाठींची गरज आहे.

दुसरीकडे देशात लॉकडाउनमुळे वस्त्रोद्योग ठप्प राहिल्याने कापसावर प्रक्रिया संथ गतीने झाली. खासगी जिनींग प्रेसिंग कारखान्यांकडे हवी तेवढी रुई नाही. फक्त शासन किंवा भारतीय कापूस महामंडळाकडे सुमारे ११२ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) शिल्लक आहे. तर सुमारे ३५ लाख गाठींची निर्यात देशातून झाली आहे. येत्या रविवारपर्यंत (ता.३१) एकूण ३८ लाख गाठींची निर्यात देशातून होईल.

रुपयाची घसरण निर्यातदारांना लाभदायी
मागील दोन महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होवून त्याचे १० टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. यामुळे भारतीय कापूस चीन, बांग्लादेश व इतर आयातदारांना ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्या कापसाच्या तुलनेत स्वस्त पडत आहे. इतर देशांच्या कापसाचे दर सध्या ६६ ते ७० सेंट प्रतिपाऊंड असे आहेत. तर भारतीय कापसाचे दर ५८ ते ६१ सेंट प्रतिपाउंड असे आहेत. अर्थातच किमान सहा सेंट प्रतिपाउंड एवढे कमी दर भारतीय कापसाचे आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या कापसाचे दर सध्या प्रतिखंडी ३८ हजार ५०० पर्यंत आहेत. भारतीय खंडीचे दर कमाल ३४ हजार रुपयांपर्यंत आहेत. यामुळे आयातदार भारतीय कापसाकडे वळले आहेत. परिणामी देशातील निर्यात वाढली असून, या महिन्यात बांगलादेशात सर्वाधिक दोन लाख, चीन व व्हिएतनाममध्ये प्रत्येकी एक लाख गाठींची निर्यात झाली, अशी माहिती मिळाली.

कच्च्या तेलाच्या दरातील सुधारणा फायद्याची
सिंथेटीक कापड किंवा पॉलिस्टरसाठी कच्च्या तेलाचा उपयोग केला जातो. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण कापडापैकी ५२ टक्के कापड हे सिंथेटिक किंवा पॉलिस्टर प्रकारचे असते. सध्या कच्च्या तेलाच्या दरात सुधारणा दिसत आहे. यामुळे सिंथेटिक धाग्याच्या दरात सुधारणा होत असून, देशांतर्गत बाजारात सुताची मागणी वाढू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा भारताला लाभ
जगातला सर्वात मोठा वस्त्रोद्योग चालविणाऱ्या चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध कायम आहे. शिवाय आता रुपया कमजोर झाल्याने भारतीय कापूस स्वस्त झाला आहे. यामुळे चीन भारतीय कापसाला पसंती देणार आहे. चीनमध्ये कमी दर्जाच्या कापसावर चांगली प्रक्रिया करून दर्जेदार सूत, कापड निर्मिती करणारी यंत्रणा असल्याने चीन कमी दर्जाचे सूत व रुईदेखील खरेदी करीत आहे. याचा फटका जगातला सर्वात मोठा कापूस निर्यातदार असलेल्या अमेरिकेला बसणार आहे. अमेरिका दरवर्षी किमान २५० ते २५४ लाख गाठींची निर्यात करतो. परंतु विविध कारणांमुळे या हंगामात अमेरिकेतील कापूस निर्यात ६५ ते ७५ टक्क्‍यांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral