support@dailyagronews.com      +91-8484924178

जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य उपचारांची गरज

जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य उपचारांची गरज
By: Agro11 Posted On: January 02, 2018 View: 356

जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य उपचारांची गरज

वांझ जनावरांची जोपासना हे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. योग्य प्रजनन दर गाठण्यासाठी गायी-म्हशींना आजारांपासून मुक्त ठेवणे, त्यांना उत्तम प्रकारचा सकस आहार देणे अावश्‍यक अाहे. जनावरांमधील वंध्यत्वावर वेळेवर उपचार केल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे वर्षाला एक वासरू मिळते, सातत्यपूर्ण दूध उत्पादन होते आणि इतर अतिरिक्त खर्च कमी होतात.  
 

जनावरांमधील वंध्यत्व हे दुग्ध व्यवसायातील आर्थिक नुकसानीचे मुख्य कारण आहे. मादी जनावरांमधील वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. 

कायमचे वंध्यत्व
कायमचे वंध्यत्व हे आनुवंशिक, गर्भाशयातील विकृती व व्यंग, जन्मजात गर्भाशयातील रचनात्मक दोष, सदोष बीजांडे, सदोष गर्भाशयमुख यामुळे असते. अशी जनावरे प्रजननांसाठी कायमची सक्षम नसतात. त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही.

तात्पुरते वंध्यत्व
तात्पुरते वंध्यत्व हे कुपोषण, गर्भाशय संसर्ग, अनियमित लैंगिक चक्र, मादीमधील बीजांड दोष, बीजकोशचा आकार, संप्रेरकामधील असमतोलपणा, व्यवस्थापकीय चुका, पशुखाद्याचे अयोग्य नियोजन, माजाचे अयोग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाचे अयोग्य व्यवस्थापन इ. कारणे असू शकतात.

माज चक्र

जनावरांमधील वंध्यत्व समजून घ्यायचे असेल तर आधी माज चक्र समजून घेणे अत्यावश्यक आहे.

गाईमध्ये माज चक्राची सुरवात १५ ते १८ महिन्याला व म्हशीमध्ये २४ ते ३० महिन्यात सुरू होते आणि ते वयापेक्षा वजनावर जास्त अवलंबून असते. 

गाई आणि म्हशीचे माज चक्र हे १९ ते २१ दिवसाचे असते आणि माजाचा काळ हा १८-२४ तासांचा असतो. 

गाईमधील माज दिसून येतो, परंतु म्हशींमध्ये मुका माज असल्याने  लगेच माज चक्र दिसत नाही. 

गाई, म्हशींतील माजाची लक्षणे
मुका, तीव्र व मध्यम माज असे प्रकार आहेत. योग्य माज ओळखल्यास दोन वेतांतील अंतर कमी होण्यास मदत होते. 

सुरवातीचा माज - माजाच्या सुरवातीच्या काळामध्ये काही बाह्य लक्षणे आढळून येतात. जसे, गाय ओरडणे हंबरणे, सतत लघवी करणे, सोट/बळस योनीमार्गात दिसून येणे, चारा कमी खाणे व पातळ शेण टाकणे. माजावरील जनावर सोबतच्या जनावरावरती पाय टाकणे.

मधला माज - या काळामध्ये सोट किंवा बळसाचे प्रमाण अधिक आढळून येते. माजातील मादी इतर जनावरांच्या समोर उभे राहते. शेपटी हलवते.

शेवटचा माज (उतरता माज) - वरील सांगितलेली माजाची लक्षणे कमी होत जातात.

सकाळ-सायंकाळ जनावरांची पाहणी, उपकरणांचा वापर, स्त्रावाची सूक्ष्मदर्षकाखाली चाचणी, वळूचा वापर इत्यादी पद्धतीचा वापर करून माज ओळखता येतो. 

माजाच्या काळामध्ये काही बाह्य लक्षणे आढळून येतात. उदा. गायीमध्ये ओरडणे/हंबरणे तसेच गाई व म्हशीमध्ये सतत शेपटी वर करणे, हलवणे, सतत लघवी करणे, नेहमीपेक्षा पातळ शेण टाकणे, कमी चारा खाणे, सोट/बळस गाळणे, दुभत्या जनावरांमध्ये दूध कमी देणे.

जे पशुपालक माजाची नोंद ठेवतात आणि जनावराचे नियमित निरीक्षण करतात त्यांना वंध्यत्वाचे प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे. 

जनावरांतील माज ओळखण्यासाठी जनावरांचे दिवसातून ३ ते ४ वेळा (सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री) जवळून निरीक्षण करावे. 

आरोग्य व्यवस्थापन  
जनावरांना दर सहा महिन्यांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी.  
 जनावरांना नियमित लसीकरण करावे.
जंतुसंसर्गामुळे जनावरांमध्ये वंध्यत्व येते, अशा जनावरांवर त्वरीत उपचार करावेत.
पशुतज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन उपचार पद्धतीचा अवलंब करावा.

खाद्याचे नियोजन  
जनावरांमधील माज चक्राची सुरवात ही जनावरांच्या वयापेक्षा वजनावर मुख्यतः अवलंबून असते. म्हणूनच आहाराचे किंवा खाद्याचे उचित नियोजन म्हणजे वंध्यत्व निवारणाचे नियोजन होय.

मादी वासरांना योग्य आहार देऊन त्याची वेळेवर पौगंडावस्था गाठता येते. गाईमध्ये २३० ते २५० किलो आणि म्हशीमध्ये ३०० ते ३५० किलो वजन हे पौगंडावस्थेसाठी आदर्श आहे. जे प्रजननासाठी आणि योग्य गर्भारपणासाठी आवश्यक आहे.

जनावरांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी जास्तीच्या आहाराची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात खाद्य घटक वापरून संतुलित आहार तयार करावा. यामुळे खाद्यावरील खर्चावर नियंत्रण ठेवता येते.

जनावरांना सकस संतुलित आहार खाद्य योग्य प्रमाणात दिल्यास संपूर्ण शारीरिक संतुलन व प्रजनन बळकट करण्याकरिता फायदा होतो.  

आहारामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, खनिजे, कर्बोदके तसेच इतर घटकांचे प्रमाण योग्य स्वरूपात असावे. जनावरांना खाद्यातून दररोज २५ ते ५० ग्रॅम क्षार मिश्रण पुरवावे.

आहारामध्ये स्निग्ध पदार्थ प्रमाणाबाहेर नसावेत. यामुळे प्रजनन संस्थेवर विपरित परिणाम होतो. गर्भाशयात अनेक अडथळे निर्माण होतात.

शरीराच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार अाणि हंगामानुसार जनावरांच्या खाद्याचे नियोजन करावे. गाभण व दुभत्या जनावरांना आणि हिवाळ्यामध्ये आहार जास्त प्रमाणात द्यावा.

विल्यानंतरचा वंध्यत्वपणा अनेक जनावरांमध्ये दिसून येतो. याचे कारण म्हणजे जनावरांमधील गाभण काळातील ऊर्जेचे प्रमाण आणि शारीरिक ताण होय.

विल्यानंतर जनावरांना योग्य प्रमाणात ऊर्जा, प्रथिने अाणि क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा. त्यामुळे विल्यानंतरच्या काळात निश्‍चितच वंध्यत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

गर्भावस्थेचा कालावधी आणि नियोजन
गाईचा गर्भावस्थेचा कालावधी सुमारे २८० दिवसाचा तर म्हशींचा ३१० दिवसाचा असतो.

गर्भावस्थेमध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी आणि प्रसूतीपूर्व १० ते १५ दिवस अगोदर पशुवैद्यकाद्वारे तपासणी केल्यास प्रसूतीतील व प्रसूतीनंतर होणारे १० ते ३० टक्के आजार कमी होण्यास व दुग्धोत्पादन वाढण्यास मदत होते.

वंधत्व नियंत्रण करण्यासाठी गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात अनियंत्रित ताण आणि वाहतूक टाळावी.

गर्भावस्थामध्ये पुरेशा प्रमाणात हिरवा चारा, क्षार, खनिजे, प्रथिने खाद्यामध्ये दिल्याने नवजात वासरांमधील व्यंग टाळता येते. 

गाभण जनावरांना योग्य पोषण व व्यायाम द्यावा. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास, जन्माच्या वेळी सामान्य वजनासह वासराचा जन्म होण्यास, आजाराचे प्रमाण कमी होण्यास आणि माज चक्र पुन्हा लवकर सुरू होण्यास मदत होते.

गाई-म्हशींची प्रसूती स्वच्छ जागेमध्ये केल्याने गर्भाशयाचा संसर्ग टाळता येतो. 

रेतनाचा कालावधी
माजाच्या लक्षणांवरून जनावरांची नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करण्याची वेळ निश्चित करावी लागते.

सर्वसाधारणपणे जनावर सकाळी माज दाखवत असेल तर त्यास सांयकाळी रेतन करावे.जनावर सायंकाळी माज दाखवत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रेतन करावे.

नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करताना यामध्ये काही ठोकताळे वापरले पाहिजेत. जसे की माजाची लक्षणे, माजाचा कालावधी, स्त्रीबीज सुटण्याची वेळ, गर्भाशयाची अवस्था लक्षात घेऊन रेतन करावे.

गायीकरिता दोन वेळा रेतन केले तर गर्भधारणेचे प्रमाण वाढते. म्हशीमध्ये मात्र जेव्हा माज दिसतो तेव्हा ८ ते १० तासाच्या आत रेतन केले पाहिजे, कारण म्हशीमध्ये माजाचा कालावधी कमी असतो.

कृत्रिम रेतन करताना घ्यायची काळजी
वीर्यकांडी ३७  ते ३८ अंश  सेल्सिअस तापमानाच्या कोमट पाण्यात ३० सेंकदासाठी ठेवूनच नंतर कापसाने किंवा टिशू पेपरणे पुसून कृत्रिम रेतन करावे.
कृत्रिम रेतन हे नेहमी गर्भाशय मुखाच्या मध्यभागी करावे.
माज व कृत्रिम रेतन यांच्या तारखांची जनावरानुसार नोंद ठेवावी.
गर्भाधारणेच्या खात्रीसाठी २१ दिवसानंतर जनावरांवर लक्ष ठेवावे. गर्भधारणा झाली नसेल तर जनावर २१ दिवसांनी परत माजावर येते.
४५ ते ६० दिवसांनी पशुवैद्यकाद्वारे गर्भधारणेसाठी तपासणी करून घ्यावी.

प्रजनन नियोजन 
गाईपासून वर्षाला एक व म्हशीपासून दीड वर्षाला एक वासरू मिळायला हवे. त्यासाठी योग्य प्रकारे प्रजनन नियोजन असणे अत्यावश्यक आहे.

ज्या जनावरामध्ये माज चक्र दिसत नाही किंवा माज येत नाही त्यांची पशुतज्ज्ञांद्वारे तपासणी करून उपचार करावेत. वेळोवेळी किंवा चार महिन्यांत एकदा गर्भाशयाची पशुतज्ज्ञांद्वारे तपासणी करून वंध्यत्वाचे योग्य निदान करता येते. गर्भाशयातील अवस्थेनुसार पशुतज्ज्ञांद्वारे वंध्यत्वावर उपचार करून घ्यावा.

वंध्यत्वाची कारणे, तज्ज्ञांकडून गर्भतपासणी व उपचार आणि जनावरातील माजाचे नियोजन याची सांगड घालावी.

- डॉ. एस. एस. रामटेके, ९४२२९६३५७८, ९७६३९६३२७० (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Let's block ads! (Why?)

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral