
बहुगुणी कडुनिंब

विविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, खरूज (कोरडी) यावरील उपचारासाठी कडुनिंबाचे तेल उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या येऊन बऱ्या झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून स्नान करावे. कारण कडुनिंब कृमिनाशक, रक्तदोषनाशक म्हणून कार्य करते.
आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्याच्या बाजूला असलेली कडुनिंबाची झाडे सर्वांना परिचित आहेत. विविध औषधी गुणधर्मांमुळे कडुनिंबाला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. कडुनिंबाच्या पानांना गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असते. या झाडाची पाने, फुले, बिया, खोडाची साल असे सर्वच भाग उपयुक्त असतात. विविध औषधांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो.
- कोणत्याही प्रकारचा ताप, कडकी यासाठी कडुनिंबाची साल आणि गुळवेल यांचा काढा करून दिला जातो. या वनस्पतीची पावडर मेडिकल किंवा काष्ठौषधीच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. तसेच झाडाचे खोड उगाळून त्यात खडीसाखर मिसळून दिल्यास मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी होते.
- विविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, खरूज (कोरडी) यावरील उपचारासाठी कडुनिंबाचे तेल उपयुक्त आहे.
- कडुनिंब हे कृमींवरसुद्धा उत्तम कार्य करते. कडुनिंब पानाच्या रसामध्ये मध, वावडिंग पावडर घालून दिल्यास कृमीवर चांगला परिणाम होतो.
- दातांच्या उत्तम आरोग्यासाठी कडुनिंब खूप फायदेशीर आहे. रोज कडुनिंबाच्या काडीने दात घासावेत, त्यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. दात किडलेले असल्यास, कडुनिंबाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. तसेच तोंडामध्ये त्याजागी थोडा वेळ काढा धरून ठेवावा.
- त्वचेवरील जखम, व्रण आकाराने लहान असेल तर कडुनिंबाच्या काढ्याने जखम स्वच्छ धुऊन घ्यावी आणि नंतर कोरडी करून त्यावर निंबतेल लावावे.
- गोवर, कांजिण्या येऊन बऱ्या झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून स्नान करावे. कारण कडुनिंब कृमिनाशक, रक्तदोषनाशक म्हणून कार्य करते. त्वचेवरील खाज, आग कमी करण्यासाठी तसेच रक्तशुद्धीसाठी कडुनिंबाचा उपयोग होतो. विविध आजारांच्या लक्षणांनुसार इतर औषधांसमवेत काढा तसेच पावडर स्वरूपात त्याचा उपयोग होतो.
पथ्य ः
बहुगुणी कडुनिंबाचा उपयोग करताना काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. आहारात तिखट, तेलकट, बाहेरचे पदार्थ, फळे, दूध, लोणचे, दही, आंबट ताक यांचे सेवन करणे पूर्ण बंद करावे. त्यामुळे कृमी, त्वचाविकार व रक्तदोषाला प्रतिबंध होतो.
टीप ः खूप बळावलेला जुनाट त्वचाविकार, वारंवार ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७